सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग-सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अभिजित पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, ह.भ.प. बंडा तात्या कराडकर, श्री. सहस्रबुद्धे, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच अनेक मान्यवर वारकरी व भाविक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड