सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबरमध्येच २७ जिल्ह्यांमधील ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र, भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्याने अनेक गावांमधील पंचनामेच करता आलेले नाहीत. अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाच लाख हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांचे पुरामुळे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात झाली आहे. अख्खा खरीप वाया गेला आणि आता रब्बीची पेरणीही लांबल्याची स्थिती आहे. महापुरामुळे १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले, अनेकांची जनावरे, घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले.अतिवृष्टी व पुरामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाता येत नाही. अजूनही बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरुच असून ते पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविला जाईल. त्यासाठी आणखी काही दिवस लागतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड