‘एफडीए’ पुण्यात इतर कंपन्‍यांच्या औषधाचीही करणार तपासणी
पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्‍ड्रीफ कफ सिरपचे सेवन केल्‍याने मध्‍य प्रदेश येथे बालकांचा मृत्‍यू झाल्‍याप्रकरणी पुण्‍याच्‍या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए, औषध विभाग) खबरदारी म्‍हणून पुण्‍यातील मेडिकलमधून खोकल्‍यावरील इतर कंपन्‍यांचे कफ सिरपच
‘एफडीए’ पुण्यात इतर कंपन्‍यांच्या औषधाचीही करणार तपासणी


पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्‍ड्रीफ कफ सिरपचे सेवन केल्‍याने मध्‍य प्रदेश येथे बालकांचा मृत्‍यू झाल्‍याप्रकरणी पुण्‍याच्‍या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए, औषध विभाग) खबरदारी म्‍हणून पुण्‍यातील मेडिकलमधून खोकल्‍यावरील इतर कंपन्‍यांचे कफ सिरपचे नमुने गोळा करण्‍यास सुरुवात केली आहे. औषधांचे हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्‍यामध्‍ये काही अपायकारक घटक आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे.

राज्‍याच्‍या अन्न व औषध प्रशासनाने ‘कोल्‍ड्रीफ कफ सिरप’च्‍या वापरावर बंदी घातली आहे. हे सिरप तमिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील ‘सरेशन फार्मा’ या कंपनीकडून तयार करण्यात आले आहे. त्‍यामध्ये ‘डायथिलीन ग्‍लायकॉल’ (डीइजी) नावाचे विषारी द्रव्य मिसळले असल्याची शक्‍यता आहे. हे रसायन मानवासाठी अत्यंत घातक असून यामुळे गंभीर विषबाधा किंवा मूत्रपिंडाला इजा होऊन मृत्यू होऊ शकतो. यालाच अनुसरून महाराष्‍ट्र ‘एफडीए’ने इतर कंपन्‍यांच्‍या कफ सिरपची देखील चाचणी करण्‍याचे ठरवले आहे.

याबाबत माहिती देताना पुणे विभागाच्‍या ‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्‍त आश्विन ठाकरे म्‍हणाले, ‘‘खबरदारी म्‍हणून राज्‍य ‘एफडीए’ने दिलेल्‍या निर्देशानुसार पुण्‍यात खोकल्‍याची औषधे तयार करणाऱ्या इतर कंपन्यांचे नमुने मेडिकलमधून घेण्यास सुरवात केली आहे. कोल्‍ड्रीफ सिरपचा साठा पुण्‍यात झालेला नाही. तसेच कोणाकडे साठा असल्‍यास तो कळविण्याच्या सूचना औषध विक्रेत्‍यांना केल्‍या आहेत. त्‍यानुसार त्याचा साठा असल्‍याचेही अद्याप कोणी कळविलेले नाही.’’ ‘एफडीए’ने त्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत. खरे तर ऑनलाइन औषध विक्रीमुळे अशा प्रकारच्‍या बनावट औषधांची विक्री होत असल्‍याचे दिसून येत असून त्‍यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशा प्रकारच्‍या ऑनलाइन औषध विक्रेत्‍या कंपन्‍यांवर गुन्‍हे दाखल करायला हवेत. औषधविक्रेते हे डॉक्‍टरांची चिठ्‌ठी असेल तरच (प्रिस्क्रिप्शन) औषधे देतात.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande