छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यामध्ये धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद 'इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला' प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या घोषणेमुळे तब्बल तीन वर्षांपासून थांबलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
धाराशिव नगरपालिकेची मुदत संपल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून येथे प्रशासक राजवट लागू आहे. यामुळे शहराचा कारभार लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत पाहिला जात होता. नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते अनेक दिवसांपासून निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते. आता दिवाळीनंतर निवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे, असे मानले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, धाराशिवचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आता या प्रवर्गातील सक्षम आणि लोकप्रिय महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. यासोबतच, जिल्ह्यातील कळंब आणि भूम नगरपालिकांचे अध्यक्षपद 'खुला वर्ग महिला' प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्येही आता खुल्या प्रवर्गातील महिला इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
एकंदरीत, या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील धाराशिव, कळंब आणि भूम या तिन्ही नगरपालिकांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, तीन वर्षांच्या खंडानंतर होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या घोषणेमुळे राजकीय समीकरणे जुळवण्यास वेग आला असून, अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis