सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। मोहोळ तालुक्यामध्ये ११ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नंतर आलेल्या महापुरामुळे शेतीपिके, घरे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील ९ पैकी ८ महसूल मंडळांना या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून, पूरबाधित महसूल मंडळे वगळता इतर मंडळांमधील पंचनाम्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार राजू खरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी अजित पवार यांच्याकडे तातडीने उर्वरित पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड