पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय गिग कामगार मंचाशी संलग्न रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी गुरुवारी संप करण्याचा इशारा दिला आहे. ‘ओला, उबेर, रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी कारभाराला परिवहन मंत्रीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मंत्री या कंपन्यांकडून प्रायोजकत्व घेऊन त्यांना पाठीशी घालत आहेत,’ असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी सोमवारी केला.
येत्या गुरुवारी (९ ऑक्टोबर) केद्रीय वित्त विभागातील तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. त्या वेळी परिवहन विभागाच्या कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी मंचाशी संलग्न प्रवासी रिक्षा, टॅक्सी, कॅब सेवा बंद ठेवून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
डाॅ. क्षीरसागर म्हणाले, ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबेर, रॅपिडोसारख्या कंपन्यांना परिवहन विभागाच्या निर्देशांनुसार प्रति किलोमीटरनुसार दर निश्चित करून दिले आहेत. मात्र, या कंपन्यांकडून परिवहन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. अद्यापही जुनाच दर ठेवण्यात आला आहे. याबाबत आझाद मैदान, परिवहन आयुक्त कार्यालय आणि राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, परिवहन मंत्रालय किंवा अधिकाऱ्यांकडून अद्याप ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. या उलट परिवहन विभागाकडून आंदोलकांवरच कारवाई झाली. त्यामुळे मंचाने गुरुवारी (९ ऑगस्ट) राज्यभर संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आझाद मैदानातील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु