अमरावती : अतिवृष्टीमुळे यावली परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.) यावली शहीद, नरसिंगपूर, भगवानपूर, भारतपूर, देवापूर, औरंगपूर परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांवर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या धार पावसामुळे फळबागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रा
यावली परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात  जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन,नुकसानभरपाईची मागणी


अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.)

यावली शहीद, नरसिंगपूर, भगवानपूर, भारतपूर, देवापूर, औरंगपूर परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांवर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या धार पावसामुळे फळबागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकतेच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली आहे. पावसामुळे जमिनीत पाणी साचल्याने फळांची झड वाढली आहे. गावाच्या शिवारात पडलेल्या संत्रा फळांचा सडा पाहून शेतकरी अक्षरशः खचून गेले आहेत. अनेक बागांमध्ये झाडांवर फळे नसल्यासारखी अवस्था निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचा मेहनतीचा सर्व हिशोब कोलमडला आहे.यात भर म्हणजे, बागेतून उरलेली फळे बाहेर काढण्यासाठी योग्य पांदन रस्ते नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची शेवटची आशा सुद्धा मावळली आहे. या फळगळतीमुळे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीची शासनाने दखल घ्यावी, तसेच नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. यावली व परिसरातील शेतकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती येथे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या या आघातातून सावरण्यासाठी शासनाने तत्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.निवेदन देताना यावली येथील उपसरपंच नितीनराव पाचघरे, तुषार खवले, गजानन देशमुख, विजय घाटोळ, सतीश उमाप, संजय वाघ, साहेबराव पोजगे, विनोद मनगटे, घनश्याम लोने, प्रशांत घाटोल, अवधूत उमप, रामभाऊ सरकटे तसेच परिसरातील इतर संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande