पुणे - अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यासाठी अधिकारी रस्त्यावर
पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। ‘शहराच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत की, दररोज किमान पाच गुन्ह
पुणे - अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यासाठी अधिकारी रस्त्यावर


पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। ‘शहराच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत की, दररोज किमान पाच गुन्हे अनधिकृत फ्लेक्सविरोधात दाखल करावेत तसेच फ्लेक्सचे सांगाडे तुकडे करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत,‌’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली

शहरात सध्या वाढदिवस, सण, स्वागत, निवड किंवा नियुक्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी उभारले जाणारे फ्लेक्स, विद्युत खांब, सिग्नल, दुभाजक आणि सार्वजनिक स्थळांवर धोकादायक पद्धतीने लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फ्लेक्सबाजीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागांकडून कारवाई केली जात असली, तरी राजकीय फ्लेक्सला मिळणारे ‌‘अभय‌’ हे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे, त्यामुळे हे फ्लेक्स व बॅनर काढण्यासाठी व या कारवाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तीनही अतिरिक्त आयुक्तांना परिमंडळांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाईची पाहणी करणार आहेत, असे पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande