लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शासकीय विश्रामगृह हॉल न दिल्याने शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला काचेचे दरवाजे फोडले
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृहात तोडफोड केल्याची घटना आज घडली आहे. मराठवाडा स्तरीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज लातूरमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित राहणार होते.
बैठकीसाठी शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहातील हॉलची मागणी केली होती. मात्र, अचानकपणे हॉल उपलब्ध करून देता येणार नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी हॉलचे काचेचे दरवाजे फोडत संताप व्यक्त केला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, अंबादास दानवे यांनी नंतर विश्रामगृहातील भोजन कक्षातच आढावा बैठक घेतली. या घटनेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis