सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. नगरपालिका, नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलाराज येणार असल्याचे यामध्ये स्पष्ट झाले. या आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना नगराध्यक्ष निवडणूक लढविण्याचा आता मनसुबाच राहिला आहे.
अकलूज मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला आहे. येथील ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यादांच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. अकलूजचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. मोहोळ, मैंदर्गीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. कुर्डूवाडीचे नगराध्यक्षपद मागास प्रवर्ग महिलासाठी तर सांगोल्यात नगरपालिका मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी प्रवर्गातील नगराध्यक्ष होणार आहे.
आ. समाधान आवताडे यांच्यासाठी महत्त्वाच्या मंगळवेढ्याचे नगराध्यक्षपद सर्वसधारण महिला प्रवर्गासाठी तर माजी आ. प्रशांत परिचारक यांच्यासाठी महत्त्वाच्या असणार्या पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तसेच करमाळा, बार्शीचे नगराध्यक्षपदही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले.आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या अक्कलकोट, दुधनी या दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड