पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला नवे पंख देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे ५० विद्यार्थी इस्रोला भेट देण्यासाठी रवाना झाले. त्यांना थुंबा इक्वेटोरियल रॉकेट प्रक्षेपण स्थळावरून बुधवारी होत असलेले रॉकेट प्रक्षेपण प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे रुजविण्यासाठी जिल्हा परिषदेने नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यासाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) आयोजित तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांची निवड केली. या परीक्षेत १३ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ५० विद्यार्थी इस्रोला आणि २५ विद्यार्थी नासाला जाणार आहेत. त्यापैकी इस्रोसाठी पुणे विमानतळावरून विद्यार्थी रवाना झाले. चार दिवसांच्या या अभ्यासदौऱ्यात विविध संस्थांना हे विद्यार्थी भेटी देतील. त्यामध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, इस्रो अंतराळ संग्रहालय, केरळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट प्रक्षेपणस्थळ तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु