
कैरो, 10 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय नेमबाज अनिश भानवालाने आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत (पिस्तूल/रायफल) दिमाखदार कामगिरी करत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. हरियाणाच्या २३ वर्षीय या नेमबाजपटूने अंतिम फेरीत दोन शूट-ऑफ जिंकले. त्याने प्रथम जर्मनीच्या इमॅन्युएल मुलरला तिसऱ्या स्थानासाठी पराभूत केले आणि नंतर युक्रेनच्या मॅक्सिम होरोडायनेट्सवर मात करत रौप्य पदक जिंकले. अनिशने पात्रता फेरीत ५८५ गुणांसह (२९१+२९४) दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पिस्तूल अंतिम फेरीत हा त्याचा पहिलाच सहभाग होता.
अनिशने अंतिम फेरीत २८ गुण मिळवले, तर फ्रान्सच्या क्लेमेंट बेसागुएटने ३१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. बेसागुएटने ५८९ गुणांसह पात्रता फेरीतही अव्वल स्थान पटकावले. अंतिम फेरीच्या पहिल्या तीन मालिकांनंतर, अनिश १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता, तर चीनचा नी झिक्सिन १७ गुणांसह पहिल्या स्थानावर होता. त्याने एलिमिनेशन फेरीत आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली, सलग चार गुण मिळवत अव्वल मानांकित संघाशी बरोबरी केली. तिसऱ्या एलिमिनेशन फेरीत एका किरकोळ चुकीमुळे तो एकूण २२ गुणांसह पिछाडीवर राहिला, तर बेसागुएट २५ गुणांसह पहिल्या स्थानावर आला. तरीही, अनिशने जोरदार पुनरागमन केले. शूट-ऑफ जिंकला आणि रौप्य पदक मिळवले. इतर भारतीय नेमबाजांमध्ये, आदर्श सिंग ५७५ गुणांसह (२८५+२९०) २२ व्या स्थानावर राहिला, तर समीर ५७१ गुणांसह (२८६+२८५) ३५ व्या स्थानावर राहिला. सांघिक स्पर्धेत, अनिश, आदर्श आणि समीर यांचा भारतीय संघ एकूण १७३१ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे