
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मानसी संजय हांदे हिने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. रिंगणे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे तिचे मूळ गाव असून ती मुंबईतील जोगेश्वरी येथील शामनगर येथे तिच्या पालकांसमवेत राहते.
मानसीने झुनझुनवाला महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले असून कबड्डी हा तिचा आवडता खेळ आहे. मात्र कोरोना काळात कबड्डीचा सराव बंद झाल्याने व्यायाम सुरू ठेवण्यासाठी तिने जवळच्याच व्यायामशाळेत जाणे सुरू केले. तिचा सराव पॉवर लिफ्टिंगसाठी उपयुक्त असल्याचे पाहून व्यवस्थापकांनी तिला तसे मार्गदर्शन सुरू केले. लवकरच तिने हा खेळ आत्मसात करीत स्थानिक पातळीवरील अनेक स्पर्धा जिंकल्या. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविल्याने तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खुणावू लागल्या आहेत.
लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन तिचे कौतुक करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटकर, गणेश चव्हाण व रमेश काटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी