
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी जोरदार स्फोट झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, तर सुमारे 30 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये झाला. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या अनेक गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या.
दिल्लीमध्ये 2011 नंतरचा हा पहिला मोठा स्फोट मानला जात आहे. मात्र, अद्याप या स्फोटाचे अचूक कारण स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला सांगितले जात होते की सीएनजी कारमध्ये आग लागली, पण स्फोटाची भीषणता पाहता अनेक शंका आणि तर्क व्यक्त केले जात आहेत. दिल्लीत स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही राजधानीत अनेक जीवघेणे स्फोट झाले आहेत. दिल्लीतील बहुतांश स्फोटांचा दहशतवादी घटनांशी संबंध होता. त्यामध्ये इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांचा सहभाग होता. या हल्ल्यांनंतर दिल्लीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणे, तसेच गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम बनवणे अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या दशकभरात मोठा स्फोट झाला नव्हता. मात्र, आता पुन्हा अशी घटना घडली असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके