
घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा घेतला आढावा
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आज, सोमवारी स्फोट होऊन 13 जण मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेतली.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेनंतर एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. रुग्णालयातच त्यांनी दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोल्चा यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर शहा यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 4 जवळ सुमारे संध्याकाळी 6.55 वाजता हा स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवळ उभ्या वाहनांना आग लागली आणि आसपास मोठी दहशत निर्माण झाली. घटनास्थळी अफरातफर माजली. स्फोट एवढा जोरदार होता की लाल किल्ल्याजवळील लाल मंदिराच्या परिसरात कारचे काही भाग येऊन पडले, तसेच मंदिर आणि मेट्रो स्टेशनवरील काचा फुटल्या.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली स्फोटाच्या घटनेवर दुःख व्यक्त केलेय. यासंदर्भातील ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात राजनाथ सिंह म्हणाले की, दिल्लीमध्ये झालेल्या कार स्फोटाची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अतिशय दुःखद प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. असे त्यांनी नमूद केलेय.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी