हरियाणा : आतापर्यंत 2900 किलो स्फोटके जप्त
फरीदाबाद, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या शेजारील फरीदाबादमध्ये आयईडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2900 किलो स्फोटकांच्या जप्तीने संपूर्ण देश हादरून गेला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी 2 काश्मिरी डॉक्टरांच्या अटकेचा खुलासा करताना हे आंतरराज्यी
हरियाणात जप्तीची कारवाई करताना पोलिस पथक


फरीदाबाद, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या शेजारील फरीदाबादमध्ये आयईडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2900 किलो स्फोटकांच्या जप्तीने संपूर्ण देश हादरून गेला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी 2 काश्मिरी डॉक्टरांच्या अटकेचा खुलासा करताना हे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अनंतनागचा रहिवासी डॉ. आदिल अहमद राथर आणि हरियाणातील फरीदाबादहून डॉ. मुजम्मिल अहमद गनई यांना अटक केली आहे. तसेच, एका महिला डॉक्टरची भूमिकाही या प्रकरणात समोर येत आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांच्या पहिल्या निवेदनानुसार, आजपर्यंत 2 डॉक्टरांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरिफ निसार डार उर्फ साहिल (नौगाम, श्रीनगर), यासिर-उल-अशरफ (श्रीनगर), मकसूद अहमद डार उर्फ शाहिद (नौगाम, श्रीनगर), मौलवी इरफान अहमद (शोपियां), ज़मीर अहमद अहंगर उर्फ मुतलाशा (वाकुरा, गांदरबल), डॉ. मुजम्मिल अहमद गनई उर्फ मुसैब (कोइल, पुलवामा), डॉ. आदिल, (वानपोरा, कुलगाम) यांचा समावेश आहे. अटकेत घेतलेले आरोपी जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गझवत-उल-हिंद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे जम्मू-कश्मीर पोलिसांनी अनंतनागसह विविध भागांत शोधमोहीम सुरू केली असून, दुसरीकडे हरियाणा पोलिसांनीही चौकशीचा व्याप वाढवला आहे.

दहशतवादी मॉड्यूलचे स्वरूप

जम्मू-कश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, हा कट्टरपंथी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असलेला आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क आहे. पकडलेल्या आरोपींचा पाकिस्तान व इतर देशांतील परदेशी मार्गदर्शकांशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशीत पोलिसांना संशयास्पद दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि आयईडी बनवण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ मिळाले आहेत. आरोपींकडून एक चिनी स्टार पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, एक एके-56 रायफल, आणि एक एके क्रिंकोव्ह रायफल (सर्व शस्त्रांमध्ये गोळ्या असलेल्या) जप्त करण्यात आल्या. फरीदाबादमध्ये सापडलेली 2900 किलो आयईडी तयार करण्याची सामग्रीमध्ये स्फोटक पदार्थ, रसायने, अभिकर्मक, ज्वलनशील द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटऱ्या, तारा, रिमोट कंट्रोल, टाइमर आणि धातूच्या पत्र्याचा समावेश आहे.

महिला डॉक्टरच्या भूमिकेचा तपास

फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरची संभाव्य भूमिकाही पोलिस तपासत आहेत. तिच्या कारमध्ये एक असॉल्ट रायफल सापडली असून ती सध्या चौकशीसाठी जम्मू-कश्मीरमध्ये आहे. विद्यापीठाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, जेणेकरून पुराव्यांशी छेडछाड होऊ नये.उघड झाले आहे की सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुजम्मिल यांनी स्फोटक आणि शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी विद्यापीठाजवळ स्वतंत्र खोली भाड्याने घेतली होती. फरीदाबादचे पोलिस आयुक्त सतींद्र कुमार गुप्ता यांनी याची पुष्टी केली आहे.

पोलिस तपासातील नव्या घडामोडी

डॉ. मुजम्मिल यांच्या अटकेनंतर साधारण दहा दिवसांनी पोलिसांनी फरीदाबादच्या धौज भागातील त्यांच्या भाड्याच्या घराची झडती घेतली. तिथून सुमारे ३६० किलो अत्यंत ज्वलनशील पदार्थ (अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय) तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य सापडले.यामध्ये एक असॉल्ट रायफल (3 मॅगझिन आणि 83 जिवंत काडतुसे), एक पिस्तूल ( 8 जिवंत काडतुसे), 2 अतिरिक्त मॅगझिन, 12 सूटकेसेस, स्फोटकांनी भरलेली एक बादली, 20 टायमर, 4 बॅटऱ्या, रिमोट 5 किलो वजनाचे धातूचे तुकडे, एक वॉकी-टॉकी सेट याचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या साहित्याचा वापर उत्तर भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी केला जाणार होता.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande