
हाँगकाँग, 10 नोव्हेंबर (हिं.स.)भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने शानदार पुनरागमन करत सलग तीन विजय नोंदवले आणि हाँगकाँग सिक्स २०२५ चे विजेतेपद पटकावले. अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम सामन्यात कुवेतला पराभूत करत विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली. अंतिम सामना जिंकल्यानंतर, पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादने भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या प्रसिद्ध ट्रॉफी सेलिब्रेशन शैलीचे अनुकरण केले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विजयासह, पाकिस्तान आता सर्वाधिक हाँगकाँग सिक्स जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत सहा विजेतेपदे जिंकली आहेत, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी पाच विजेतेपदे जिंकली आहेत.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने अष्टपैलू कामगिरी करत कुवेतचा ४३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने तीन बाद १३५ धावा केल्या. अब्दुल समदने १३ चेंडूत ४२ धावांची धमाकेदार खेळी केली, तर कर्णधार अब्बास आफ्रिदीने फक्त ११ चेंडूत ५२ धावा केल्या. कुवेतचा गोलंदाज मीत भावसारने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कुवेतने शानदार सुरुवात केली, अदनान इद्रिसने पहिल्याच षटकात पाच षटकार मारले आणि आठ चेंडूत ३० धावा केल्या. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि कुवेतला ९२/६ वर रोखले.
पाकिस्तानला भारताविरुद्ध स्पर्धेत एकमेव पराभव सहन लागला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुइस पद्धतीने पाकिस्तानचा दोन धावांनी पराभव केला. पण या विजयानंतर भारताला ही लय कायम राखता आली नाही आणि पुढील चार सामने गमावले आणि स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे