
नागपूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनलगत कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (महाल) आणि रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून सर्व संवेदनशील ठिकाणांना अलर्ट जारी.
महाल, रेशीमबाग, नागपूर उच्च न्यायालय, विधानभवन, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि न्यायालय परिसरात कडक नजर ठेवली जातेय. नागपूरच्या
महाल परिसरातील संघ मुख्यालयात 3 पोलीस अधिकारी राज्य राखीव दलाचे 79 जवान तैनात असून शीघ्र प्रतिसाद दलाला (क्यूआरटी) अलर्टवर ठेवण्यात आलेय. त्यासोबतच रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात:
राज्य राखीव दलाचे 100 जवान चोवीस तास करडी नजर ठेवून आहेत.
पोलिस उपायुक्त राहूल मदने यांनी सांगितले की, महाल आणि रेशीमबाग येथील दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 30 जवानांच्या दोन प्लाटून तैनात आहेत. पेट्रोलिंग वाढवून गर्दीच्या 8 ठिकाणी वाहनांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ही वाढीव सुरक्षा कारवाई दिल्लीतील स्फोटानंतर संभाव्य धोक्यांचा विचार करून केली गेली असून, नागपूर पोलिसांनी शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी