
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. मुंबईत अंधेरीतील एका हॉटेलमध्ये रविवारी, ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या या जंगी सेलिब्रेशनला ठाकरे बंधूंची उपस्थिती विशेष ठरली.
या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. सुबोध भावेच्या वाढदिवसाला मराठी मालिकांतील आणि चित्रपटविश्वातील अनेक नामांकित कलाकारांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याला खासदार नरेश मस्के देखील उपस्थित होते. ठाकरे बंधूंच्या उपस्थितीतच त्यांनी सुबोध भावे यांची भेट घेतली. यापूर्वी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले होते, त्यानंतर त्यांनी एकत्र दिवाळी साजरी केली होती. आता पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने या भेटीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule