
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून ते आयसीयूमध्ये आहेत, जेणेकरून अनावश्यक भेटीगाठींना मर्यादा ठेवता येईल. मात्र आज, सोमवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली असून, त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांचे रुग्णालयात येणे-जाणे वाढले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज प्रकृती अधिक खालावल्याने धर्मेंद्र यांना आयसीयू वेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, मात्र कुटुंबीय किंवा रुग्णालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही.याआधी, 3 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्याची सर्जरी झाली होती. त्यांच्या एका डोळ्यात धूसरपणा असल्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मोतियाबिंदाचा ऑपरेशन सुद्धा झाला होता. त्या वेळी रुग्णालयाबाहेर आलेल्या धर्मेंद्र यांनी पॅपराझींना हसत सांगितले होते — “माझ्यात अजून खूप दम आहे, मी अजूनही जिवंतपणे तयार आहे!”
89 वर्षांच्या वयातही धर्मेंद्र अभिनयात सक्रिय आहेत. त्यांना शेवटचं कृती सेनन आणि शाहिद कपूर यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात पाहिले गेले. लवकरच ते श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत झळकणार आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode