
योनिक्स–सनराईज महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित “योनिक्स–सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा” मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबरपासून उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रंगणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार आणि कॉम्प्लेक्सचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असून, समारोप व पारितोषिक वितरण सोहळा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.राज्यातील सुमारे ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा गटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. संपूर्ण राज्यभरातील उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन आगामी राज्यस्तरीय निवडीसाठी आपले कौशल्य आजमावतील.
स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण ४ लाख रुपयांची रोख बक्षिसे, चषक आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. त्याशिवाय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अतिरिक्त दीड लाख रुपयांचे विशेष पारितोषिक अंतिम फेरीतील खेळाडूंकरिता जाहीर करण्यात आले आहे.
बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडतर्फे क्रीडाप्रेमी नागरिकांना या स्पर्धेतील रोमांचक सामने आणि कौशल्यपूर्ण खेळाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारी ही राज्यस्तरीय स्पर्धा उलवेतील क्रीडाप्रेमींसाठी उत्सव ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके