
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्याने आरक्षण सोयीचे पडलेल्या इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जुळवा जुळव सुरू केली आहे. ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले आहे, तेथील इच्छुकांनी कुटूंबातील महिला सदस्यांचे बोर्ड, बॅनर्स सोशल मिडीयात झळकविण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांमध्ये आपले गणित कसे बसवायचे याचे आडाखे बांधत इतर पक्षातून तिकीट मिळविण्य़ासाठीही चाचपणी सुरू केली आहे.
अनेकांनी सोशल मिडीयावर थेट प्रचारालाही सुरूवात केली असून आरक्षणानंतर पक्ष कार्यालय, नेत्यांचे कार्यक्रम तसेच सोबत लढण्यासाठी इच्छूक असलेल्या इतर उमेदवारांच्याही भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. अनेक इच्छुकांकडून बुधवारी दिवसभर महापालिकेत प्रभागातील समस्यांची निवेदन घेवून अधिकाऱ्यांची भेट घेत फोटोसेशनही सुरू केल्याचे पहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु