अमरावती: प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची घोषणा नाही
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची नावे घोषित केलेली नाहीत. भारतीय जनता पक्ष, काँग्
उमेदवारी अर्ज दाखल होऊनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा नाही: भाजप, काँग्रेस, सेना, राकाँची नावे प्रदेश समितीकडे, 17 पर्यंत निर्णय अपेक्षित


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची नावे घोषित केलेली नाहीत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य उमेदवारांची नावे स्थानिक पातळीवरून संबंधित प्रदेश समित्यांकडे पाठवण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजेच १७ तारखेपर्यंत, योग्य उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींमध्ये एकूण २७८ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक पक्षाने आपापल्या स्तरावर तयारी केली आहे.महायुती किंवा महाविकास आघाडी संयुक्तपणे निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे, याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाने ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश निवडणूक प्रमुख तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५१:४९ असा टक्केवारीचा फॉर्म्युला ठरविला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, त्यांचा जवळचा मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या (वायएसपी) बुधवारी दुपारी झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा सूर उमटल्याची माहिती आहे.

यापूर्वी अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने ती एकेकट्यानेच लढवावी लागेल, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे युती किंवा आघाडी न होता सर्व पक्ष स्वबळावरच लढतील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

यावेळची निवडणूक विशेष रंजक ठरणार आहे, कारण गेल्या आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकसंघ होते. आता मात्र दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली असून, प्रत्येकी दोन पक्ष निर्माण झाले आहेत आणि ते भिन्न गटांमध्ये समाविष्ट आहेत. यावेळी थेट पक्षबदल झाल्याने त्याचाही परिणाम या निवडणुकीवर होणार आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यात सध्या या पक्षाचा एकही आमदार नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला होता. त्यावेळी महायुतीत काहींनी बंडखोरी केली असली तरी, आठपैकी ७ जागा भाजप आणि मित्रपक्षांना मिळाल्या होत्या, तर केवळ एका जागेवर महाविकास आघाडीतील शिवसेनेचा (उबाठा) उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे काँग्रेसचा सफाया हा मुद्दाही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande