
नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।ग्रामीण व शहरी क्षयरोग मंच (टीबी फोरम) ची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातच्या अनुषंगाने दिलेल्या उद्दिष्टपूर्ततेसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. तसेच काही अडचणी निर्माण झाल्यास प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शहर आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीउद्दीन, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपत मिरदुडे आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची सविस्तर माहिती करण्यात आली.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, उपाययोजना आणि पुढील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी समाधान व्यक्त करत जिल्ह्यात दोन नवीन जीन एक्सपर्ट मशीन (सीबीएनएएटी) वाढविण्याबाबत सूचना दिल्या. टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील रणनीती आणि उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis