
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई रामकृष्ण गवई यांना नुकतीच डी.लीट. ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आली आहे. डॉ. कमलताई गवई यांनी मानवविज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयात ‘विपश्यना : एक चिकित्सक अभ्यास’ यावर संशोधन केले आहे. या उपलब्धीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. कमलताई गवई यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव सौ. मिनल मालधुरे, प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सौ. किर्ती अर्जुन आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या येत्या दीक्षांत समारंभामध्ये डॉ. कमलताई गवई यांना डी.लीट. पदवी देवून त्यांना सन्मानित केले जाणार आहे. डॉ. कमलताई गवई ह्रा ज्येष्ठ आंबेडकरी नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी उपसभापती, माजी खासदार, माजी आमदार तसेच बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल दिवंगत श्री रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या धर्मपत्नी असून मा. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या त्या मातोश्री आहेत. डॉ. कमलताई गवई यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले असून 2007 मध्ये राजकारण व प्रशासन विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डी.एड., बी.एड., शिलाई, हस्तकला, पशु दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसाय आदी व्यावसायिक शिक्षण सुद्धा घेतले आहे. त्यांचे पुढील शिक्षण पती रा.सु. गवई यांच्या प्रेरणेने लग्नानंतर झाले आहे. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ व क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग राहिला असून त्यांनी विविध क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण पदे भूषविली आहेत. त्या विविध व्यवस्थापन समित्यांवर अध्यक्ष, सभासद व संचालक म्हणून कार्य करीत असून राष्ट्रीय सेवेमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, रशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी, श्रीलंका, विएतनाम, थायलंड, स्वीत्र्झलंड, हाँगकाँग आदी देशात शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी दौरे केले आहेत.
डॉ. कमलताई गवई यांनी मूल्यातून निपजलेले रत्न, कल्याणी महिला विकास प्रबोधिनी, कमलांजली, दिपस्तंभ, आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व, राजकीय परिपक्वतेचे प्रतिक, महाराष्ट्र भूषण रा.सु. गवई आदर्श आणि कर्तृत्व, साप्ताहिक रिपब्लीकन संदेशाच्या माध्यमातून अनेक विशेषांक, जनजागरण उपक्रम, माजी लेडी गव्हर्नर बिहार, सिक्कीम, केरळ, कुटुंबश्री उपक्रम, बिहार स्वच्छता अभियान आदी पुस्तके लिहीली आहेत. त्यांना 1969 चा साहित्य अकादमी पुरस्कार, कृषी शेती पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार, कृषीमित्र पुरस्कार, 2007 चा महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, 2017 चा लोकमत सखी मंचचा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.डॉ. कमलताई गवई यांना डी.लीट. पदवी घोषित झाल्याबद्दल त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी