अमरावती : संत्रा उत्पादकांना विम्याची मदत तात्काळ देण्याची मागणी
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये १ लाख हेक्टर क्षेत्रावर हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची मदत तात्काळ वाटप करा !


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये १ लाख हेक्टर क्षेत्रावर हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन हेक्टरी हजारो रुपये भरून २०२४ - २५ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाला व विमा कंपनीला निवेदन देऊन ८ दिवसामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजासह फळ पिक विम्याची मदत जमा करण्याची मागणी केली त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, कार्याध्यक्ष हितेश उंदरे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२४ - २५ अंतर्गत अंबिया बहारामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूल मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपये भरून लाखो हेक्टर क्षेत्राचा आंबिया बहार फळपिक विमा काढला होता. मात्र फळ पीक विम्याचा ८ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे मिळू न शकल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित आहे. अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या फळ पीक विम्याची मदत ८ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून सदर इन्शुरन्स कंपनीला काळया यादीत न टाकल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande