
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
लग्नाच्या मंडपात घडलेल्या धक्कादायक घटनेत स्टेजवर नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी राघव जितेंद्र बक्षी व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अखेर अकोल्यातून जेरबंद केले आहे. बडनेरा पोलिस ठाण्याचे एएसआय प्रमोद गुडधे यांच्या पथकाने रात्री उशिरा ही कारवाई केली. नवरदेवावर हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपी फरार होते.११ नोव्हेंबर रोजी रात्री अमरावतीत विवाहसोहळा सुरू असताना नवरदेव सुजल समुद्रे हा स्टेजवर उभा असताना आरोपी राघव बक्षी याने स्टेजवर चढून त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. हा थरार पाहून लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला होता. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बडनेरा पोलिसांच्या पथकाने अकोल्यात सापळा रचून राघव बक्षी व त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, हल्ल्याचा आणि आरोपींच्या पळून जाण्याचा संपूर्ण थरार ड्रोन कॅमेरात कैद झाला होता.या घटनेचा व्हिडीओ सम्पूर्ण राज्यभर व्हायरल झाला होता हे विशेष.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी