
जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.) अवैध धंदे चालकांकडून एकापाठोपाठ करण्यात आलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांनंतर शहरासह जिल्ह्यात कायदा सुवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात असून अशातच जळगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण २३ संशयितांवर विविध कायद्यात प्रतिबंधात्मक कारवाई करून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध धंदे चालविणाऱ्यांसह गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.जळगावमध्ये मागच्या काही दिवसात अवैध दारू अड्यांवर गोळीबाराच्या दोन घटना शहरात घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य सस्थाच्या निवडणुका आणि दिल्लीतील स्फोटानंतर दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी मोठ्या बंदोबस्तात तपासणी मोहीम, नाकाबंदी आदी मोहिमा राबविण्यात येत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांसह क्यूआरटी व आरएसपीच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत एमआयडीसी, जिल्हापेठ, शनिपेठ, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष ऑपरेशन राबविण्यात आले.एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा आदी ठिकाणी ७ व्यक्तींवर बीपी अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. शनिपेठ हद्दीतील कांचननगर, विठ्ठलपेठ, गोपाळपुरा, कोळीपेठ, गुरू नानक नगरात १४ संशयितांवर मुंबई पोलिस अॅक्ट कलम १२२ नुसार तर २ संशयितांवर एमव्ही अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलिस हद्दीतील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, तांबापुरा आणि कंजरवाड्यात ७ संशयितांवर शांतता भंग प्रतिबंधानुसार कारवाई करण्यात आली. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजीनगर, गेंदालाल मिल, शाहूनगर आदी ठिकाणी मोहीम राबवली. शिवाजीनगर भागातील एस. के. ऑइल मिलसमोर भिंतीलगत देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्यावर छापा टाकून ५६० रुपये किमतीच्या १४ बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या एका कारवाईत मिथिला अपार्टमेंटजवळील एका बिअर शॉपीमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात १६ हजार ४६५ रुपये किमतीच्या एकूण १६९ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर