
जालना, 13 नोव्हेंबर (हिं.स.)
जालना शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाले.
मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले, जालना शहरात जमलेला जनसागर पाहून खात्री पटते की आगामी निवडणुकांमध्ये जालना महापालिकेवर भगवा फडकणारच आहे. आमदार अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर आणि कार्यकर्ते जर मैदानात उतरले, तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.” “शिवसैनिक पेटला की मागे फिरत नाही. बूथप्रमुख हा पक्षाचा खरा कणा आहे. प्रत्येक बूथवर ‘सगळ्यात मजबूत कोण?’ अशी स्पर्धा लागली पाहिजे.”
त्यांनी पुढे जालना जिल्ह्याच्या विकासाबाबत सांगितले की, जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, महात्मा फुले मार्केट, सिडको, पाणीपुरवठा व नगरविकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल. झोपडपट्टीतील २.५ लाख नागरिकांना हक्कपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जालना शहराचा विकास आणखी वेगाने होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis