
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे हॉटेल बारोमासी येथे विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात एकूण 26 कोटी रू. निधीची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली.
शेतकरी, स्वयंसहायता समूह आणि समाजातील इतर गरजू वर्गाला विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे हे शिबिराचे उद्दिष्ट होते. ‘ॲग्रीकल्चर इज बेस्ट कल्चर’ ही टॅगलाईन असलेल्या या शिबिरामुळे शेतकरी आणि गरजू वर्गाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळाले. एकूण 26 कोटी निधीतून अनेक कर्ज प्रकरणांना मंजुरीबरोबरच शिबिरात 18 कोटी कर्जवितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, डाळ मिल असोसिएशनचे निखिल अग्रवाल, रोहतिया ग्रुपचे प्रकाश रोहतिया, महाबीजचे मनीष यादव, बँकेचे महाप्रबंधक डी.एस.राठौर, बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक पंकज कुमार, जिल्ह्याचे लीड बँक मॅनेजर नयन सिन्हा, नाबार्डचे श्रीराम वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
शिबिरात किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुटपालन, दुग्धशाळा, खाद्य प्रक्रिया, कृषी यांत्रिकीकरण आणि बचत गटांना कर्ज यांसारख्या कृषी आणि संलग्न सुविधांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन शेतक-यांना देण्यात आले. शिबिरात पात्र प्रकरणांना जागेवरच मंजुरी देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. यावेळी ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची आर्थिक गरजा समजून घेत त्यांना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन योजना, सेंट फूड प्रोसेसिंग योजना, सेंट कोल्ड स्टोरेज योजना, सेंट पोल्ट्री योजना आणि इतर उत्पादने आदींबाबत माहिती देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे