गौणखनिज तपासणी करताना मंडल अधिकाऱ्यासह पथकाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। गौणखनिज तपासणी करीत असताना मंडल अधिकाऱ्यासह पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर घडली. याबाबत मंडल अधिकारी रामसिंग मगनसिंग परदेशी (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आ
गौणखनिज तपासणी करताना मंडल अधिकाऱ्यासह पथकाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न


नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

गौणखनिज तपासणी करीत असताना मंडल अधिकाऱ्यासह पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर घडली.

याबाबत मंडल अधिकारी रामसिंग मगनसिंग परदेशी (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल (दि. १३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परदेशी व त्यांच्या पथकातील दोन जण हे म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवर वरिष्ठांच्या आदेशावरून गौणखनिज तपासणी करीत होते. यावेळी परदेशी यांच्या समवेत शरद सांडूगीर गोसावी व नामदेव श्रावण पवार हे तपासणी पथकात होते. ही कार्यवाही करीत असताना कणसरा माता चौकाकडून टाटा कंपनीची मालवाहू गाडी आली. ही गाडी थांबवून त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे व गौणखनिज वाहतुकीचा परवाना या अधिकाऱ्यांनी मागितला. त्यावेळी ट्रकचालकाने तुम्ही कोण मला थांबविणारे, असे म्हणत आपल्या दोन सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. त्यांच्यापैकी एकाने ट्रकचालकाला खाली उतरवीत स्वतः गाडी चालविण्यास घेतली. त्याने तपसाणी करणाऱ्या पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करीत भरधाव वेगाने वाहन घेऊन पळून गेला. या प्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध परदेशी यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन मद्रूपकर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande