बिहारमध्ये मतदारांनी काँग्रेसच्या 'फेक नरेटिव्ह'ला नाकारले - रविंद्र चव्हाण
* महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने विजयोत्सव मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने विरोधकांचा सुपडा साफ केल्यानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपा प्रदेशाध्
भाजपा चव्हाण जल्लोष


भाजपा चव्हाण जल्लोष


* महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने विजयोत्सव

मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने विरोधकांचा सुपडा साफ केल्यानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्री.चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेडीयु प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांचे प्रदेश भाजपाच्या वतीने अभिनंदन केले. 'एनडीए'ला भरभरून मते देऊन विजय प्राप्त करून देणा-या मतदारांचेही श्री. चव्हाण यांनी आभार मानले. “बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है”...“भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणा देत, ढोल ताशे वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी आ. कुमार आयलानी, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अमरजित मिश्रा, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणूक निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने मागील काही वर्षांत ताकदीने केलेल्या विकासकामांमुळे समाजातील सर्व घटकांची उन्नती झाली. त्यामुळेच बिहारच्या जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी मजल देखील मारता आली नाही त्यामुळे त्यांची स्पर्धा ही अपक्षांशी होती असा टोला ही त्यांनी लगावला.

श्री.चव्हाण म्हणाले की, निवडणूक निकालाचे चित्र पाहता काँग्रेसच्या फेक नरेटिव्ह ला जनतेने सपशेल नाकारले आहे. प्रत्येक निवडणुकीआधी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा पायंडा राहुल गांधी यांनी पाडला होता. बिहार निवडणुकीत व्होट चोरी चे फेक नरेटिव्ह पसरवून रान माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी यांचे आरोप किती बिनबुडाचे आणि फुटकळ असतात हे जनतेने सिद्ध केले आहे. मतदार यादी सखोल पडताळणी अभियानाच्या (एसआयआर) च्या आकडेवारीतून राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत होते हे स्पष्ट झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या विकासाच्या राजकारणामुळे आज देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे प्रत्येक समाजाची प्रगती होत असून पंतप्रधान मोदी यांची जादू देशभरातच नाही तर जगभरात कायम रहाणार असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

बिहार निवडणुकीचे निकाल पाहता आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत काय होणार याची स्पष्ट कल्पना आत्तापासूनच येत आहे. मुंबईमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात केंद्राकडून निधी मिळत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. महाराष्ट्राच्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचा विजय महत्वाचा आहे. केंद्राच्या प्रत्येक लोकोपयोगी योजनेचा लाभ ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती,पालिका हद्दीतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता महायुतीला नक्की आशीर्वाद देईल असा विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande