
चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। 2025-26 मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा-3 अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि उर्वरीत इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारित करण्यात आली आहे
*अभियानाची उद्दिष्ट्ये :* 1.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण क्रीडा इत्यादि घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे. 2.शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे. 3. शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृध्दीस प्रोत्साहन देणे.
*अभियानाचा कालावधी :* 3 नोव्हेंबर 2025 रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. सदर अभियानाचा कालावधी 31 डिसेबर 2025 रोजी पूर्ण होईल. 1 जानेवारी 1 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
*अभियानाचे स्वरूप :* अभियानात सहभागी होवून एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल. अ) पायाभूत सुविधा 38 गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - 101 गुण क) शैक्षणिक संपादणूक 61 गुण.
*पारितोषिकांसाठीचे निकष :* टप्पा -3 मध्ये वरच्या स्तरावर पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या शाळेस खालच्या स्तरावरील पारितोषिक अनुज्ञेय असणार नाही. तसेच शाळांना मागील वर्षीच्या टप्पा-1 (2023-24) किंवा टप्पा-2 (2024-25) मध्ये प्राप्त झालेला क्रमांक किवा त्यापेक्षा खालचा (निम्न) क्रमाकांसाठी शाळेचा या वर्षीच्या अभियानात पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या अभियानातील मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविल्यास शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र राहील.
*स्तर तालुका :* प्रथम पारितोषिक 3 लक्ष, द्वितीय पारितोषिक 2 लक्ष, तृतीय पारितोषिक 1लक्ष
*जिल्हा :* प्रथम पारितोषिक 11 लक्ष, द्वितीय पारितोषिक 5 लक्ष, तृतीय पारितोषिक 3 लक्ष
*विभाग :* प्रथम पारितोषिक 21 लक्ष, द्वितीय पारितोषिक 15 लक्ष, तृतीय पारितोषिक 11 लक्ष
*राज्य :* प्रथम पारितोषिक 51 लक्ष, द्वितीय पारितोषिक 31 लक्ष, तृतीय पारितोषिक 21 लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा-3 या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपुर तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव