
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) - सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडाला. या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांचे फोरम असलेले हेल्पिंग हॅंड्सने पुढाकार घेतला आणि यातून जमा झालेल्या ७ लाख ६५ हजार रुपयांची मदत कुर्डूवाडी गावातील बारावी ते महाविद्यालात शिकणाऱ्या १२८ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
हेल्पिंग हॅंड्सतर्फे विवा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित पत्रकार परिषदेत कौस्तुभ सावंत, जयंतीलाल जैन, शिरीष सासने, प्रमोद खेडेकर, राजू भाटलेकर, नंदू चव्हाण, भूषण बर्वे, संजय वैशंपायन आदींनी यासंबंधी विस्तृत माहिती दिली. जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा सर्व हिशेबही त्यांनी पत्रकारांसमोर मांडला.
अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या प्रकारची मदत हवी यासंबंधी माहिती घेण्यात आली. शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना मदत मिळणार होती. पण वस्तुरूप मदतीऐवजी धनादेश स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत होण्याची गरज लक्षात घेऊन ही मदत वितरित करण्यात आली. हेल्पिंग हॅंड्सच्या मदतीच्या आवाहनाला रत्नागिरीवासीयांचा प्रतिसाद मिळाला. यात करसल्लागार संघटनेने जवळपास एक लाख रुपयांचे धनादेश विद्यार्थ्यांना दिले. एकूण १२८ विद्यार्थ्यांना ७ लाख ६५ हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे दिली.
दुष्काळी नदी म्हणून ओळखली जाणारी सीना नदी कोपली आणि महापुराने माढा तालुक्यातील वीस गावे बाधित झाली. मागील सत्तर वर्षांत एकदाही या या नदीला पूर आला नव्हता. लोकांना पुराच्या पाण्याचा अंदाज नसल्याने अधिक नुकसान झाले. २०१८ पासून प्रत्येक संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या हेल्पिंग हॅंड्सच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्हा करसल्लागार संघटना, पाटीदार समाज, जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असोसिएशन आणि अनेकांनी महिनाभरात निधी गोळा केला.
रत्नागिरीपासून दूरवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करणे कठीण कामगिरी होती. यासाठी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम दुवा ठरले. वल्लभ वणजू यांच्या संपर्कातून प्राचार्य कदम यांनी कुर्डूवाडीसारख्या दुर्गम पूरग्रस्त झालेल्या गावाच्या नुकसानाची सविस्तर माहिती गोळा केली. सीना नदीकाठावरील लहानमोठ्या वीस गावातील विविध महाविद्यालयातून गरजू विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली. यासाठी डॉ. आशीष राजपूत, माध्यम प्रतिनिधी किरण चव्हाण, प्राचार्य नितीन उबाळे आदी स्थानिकांनी सहकार्य केले. यामुळे आर्थिक मदतीचा योग्य विनियोग करता आल्याचे हेल्पिंग हॅंड्सच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या रोख रकमेची ही पहिलीच मदत आहे. ही मदत अगदी वेळेवर मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या मदतीमुळे विद्यार्थी गहिवरले आणि पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
आपणही मदत करून आमच्या लोकांत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे, अशा शब्दात प्राचार्य कदम यांनी हेल्पिंग हॅंड्सचे आभार मानले. भविष्यात या मदतीची परतफेड अशीच गरजूंना मदत करून करणार असल्याचे लाभार्थीनी सांगून रत्नागिरीच्या जनतेचे आभार मानले. कोकण आमच्या मदतीला आले, भविष्यात आमची कधीही गरज लागली तर आम्ही कोकणवासीयांसाठी धावून येऊ, असे आवर्जून सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी