
जळगाव, 14 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. जळगावचे तापमान थेट ९ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले. यंदाच्या हंगामातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने आगामी काळात जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीची सुरुवात होते खरी, पण तापमान इतक्या कमी पातळीवर सहसा घसरत नाही. मात्र, यंदा अवकाळी पावसाची स्थिती संपल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रात्रीच्या तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. दरम्यान, गतवर्षी नोव्हेंबर महिन्याचे सरासरी किमान तापमान १२.५ अंशांवर होते. यंदा मात्र नोव्हेंबरच्या मध्यातच तापमान १० अंशांच्या खाली गेल्याने कडाका जाणवत आहे.नोव्हेंबर महिन्यातच एवढ्या कडाक्याची थंडी पडत असताना, डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका अजून वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर