
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वत्र उच्चतम सतर्कतेची पातळी लागू असून प्रवासी, रेल्वे कर्मचारी री आणि आणि साधनसंपत्तीच्या सुरक्षेसाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
स्थानिक पोलिस व गुप्तचर यंत्रणांशी समन्वय राखून माहितीचे आदानप्रदान आणि जलद प्रतिसाद सुनिश्चित केला जात आहे. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहेत. आर पी एफ, जी आर पी आणि वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांना संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य स्थानकांवर कुत्र्यांचे पथक, बॉम्ब शोध पथके आणि अँटी-सॅबोटेज पथके सज्ज ठेवण्यात आली असून रात्री व एकाकी भागांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी प्रवेश नियंत्रण कडक करण्यात आले आहे.
भुसावळ विभाग प्रवाशांना सुरक्षा तपासणीदरम्यान सहकार्य करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती वा वस्तू दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करत आहे. भुसावळ विभाग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून सुरक्षित व निश्चिंत रेल्वे प्रवासासाठी सतत सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV