
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बालदिनानिमित्ताने महिला व बालविकास विभागाच्यावतीने बालगृहातील मुलांसाठी आज धर्मापुरी येथील श्री राम बाग येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमुळे बालगृहातील मुलांना आनंद, उत्साह आणि अप्रतिम अनुभव लाभला.
यावेळी स्वतः जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बैलगाडी हाकली व मुलांना फेरी मारून आणली. तसेच त्यांनी मुलांसोबत गाणी गायली, गप्पा मारल्या आणि प्रेमाने बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मुलांशी मैत्रीपूर्ण नातं जुळवून त्यांच्यात मिसळण्याची त्यांची शैली सर्वांना भावली.
उपस्थित अधिकारी-कर्मचारी वर्गानेही मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले. मुलांनी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला, विविध खेळांचा, नैसर्गिक सौंदर्याचा व सहलीतील उपक्रमांचा आनंद लुटला. तसेच मुलांना या अनुभवावर निबंध लिहिण्याचे प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीक्षमता आणि सृजनशीलतेला चालना मिळणार आहे.
एकूणच, परभणी जिल्ह्यातील या उपक्रमाने बालदिनाचा खरा अर्थ उजळला. बालपणाचा आनंद, मोकळेपणा आणि निरागसता पुन्हा अनुभवणे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा बालदिन हसतमुख, आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात साजरा झाला.
प्रारंभी जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत मुलांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे, ओबीसी महामंडळाचे संचालक रामेश्वर मुंढे, बालकल्याण समिती अध्यक्ष रवींद्र कातनेश्वरकर, बालकल्याण समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिविक्षा अधिकारी, महिला विकास व बालविकास विभागातील अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइनचे कर्मचारी, संरक्षण अधिकारी तसेच बालगृह अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis