कृष्णभक्तीचा आदर्श म्हणजे संत मीराबाई - हभप कु राधा शंकर आजेगावकर
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। मोठमोठ्या विद्वानांना योगीजनांना महत् प्रयत्नांनी जे अमृतत्व ज्ञानाने, योगाने प्राप्त होत नाही ते केवळ निष्काम भक्तीने प्राप्त होते. अश्या निष्काम कृष्ण भक्ती प्रेमाचा आदर्श म्हणजे संत मीराबाई यांचे जीवन चरित्र आहे
कृष्णभक्तीचा आदर्श म्हणजे संत मीराबाई - हभप कु राधा शंकर आजेगावकर


परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। मोठमोठ्या विद्वानांना योगीजनांना महत् प्रयत्नांनी जे अमृतत्व ज्ञानाने, योगाने प्राप्त होत नाही ते केवळ निष्काम भक्तीने प्राप्त होते. अश्या निष्काम कृष्ण भक्ती प्रेमाचा आदर्श म्हणजे संत मीराबाई यांचे जीवन चरित्र आहे असे प्रतिपादन बाल कीर्तनकार कु. राधा शंकर आजेगावकर यांनी केले.

शहरातील विद्यानगर परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दिनांक 11 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या किर्तन सप्ताह प्रसंगी कीर्तनात त्यांनी विचार मांडले.

पुढे बोलताना कु. राधा यांनी सांगितले की लहानपणी आई -वडिलांच्या संस्कारामुळे मीराबाईंच्या जीवनात कृष्ण भक्तीचा प्रवेश झाला. बालवयात निरागस मनावर झालेल्या संस्कारांमुळे पुढे मीराबाई संत कवी म्हणून भारतवर्षात इसवी सन 14 व्या शतकात प्रसिद्धीस आल्या. आजही मीराबाईंच्या भावगर्भ रचना संपूर्ण भारतात अत्यंत आदराने व आनंदाने गायल्या जातात. राजस्थानातील कुडकी या लहान गावात जन्मलेली एक मुलगी आपल्या निस्सिम कृष्ण भक्तीच्या जोरावर शतकानुशतके जनमानसात लोकप्रिय झाली. त्यामुळे बालपणी होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

कु. राधाच्या कीर्तनातील भाव मधुर पदांच्या चाली आणि भजनांमुळे कीर्तनात भक्तीरंग पसरल्याचा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांना संवादिनीवर मंगेश जवळेकर तबल्यावर विशाल धानोरकर मंजिरीवर शंकर आजेगावकर ऋषिकेश औंढेकर यांनी साथ दिली. यावेळी ह भ प माधवराव आजेगावकर विम औंढेकर रामदास चव्हाण सुहास बिडकर सुधाकर लंगर श्रीकांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कीर्तनाचे यजमान काशीकर परिवारातर्फे कु. राधा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सप्ताहातील विविध मान्यवरांच्या कीर्तन प्रवचनांना परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande