
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
: नाशिक सारख्या ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक शहरात गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी धुडगूस घातला होता. मात्र आता सर्व गुंडांचा बिमोड करण्याचे काम पोलिस दलाकडून सुरू असून, यापुढील काळात देखील गुंडगिरी, दादागिरी अजिबात सहन केली जाणार नसल्याचा इशारा कुंभमेळा तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला. यावेळी महाजन यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले.
मंत्री महाजन म्हणाले, पोलिसांनी गुंडगिरी मोडून काढण्याचे काम हाती घेतल्यापासून अनेक जण शहरातून बाहेर पळुन तोंड लपवत फिरत आहेत. सर्वच जण देवांना साकडे घालत आहेत. मात्र, त्यांच्याही गुंडगिरीचा बिमोड करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी केला आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधींच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले जाणार असून, त्यादृष्टीनेच अधिकारी नियोजन करीत आहेत, असेही ते म्हणाले.
खत्रीचे कौतुक
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून धडाडीने कामकाज सुरू आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरला असल्याचे सांगत महाजन यांनी आयुक्तांच्या कामांचेही कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV