
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) | राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गडदुर्ग बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात झाले. अनेक उत्साही शिवप्रेमीनी ठिकठिकाणी दर्जेदार गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारून इतिहासाचे दर्शन घडविले. त्यांचे मूल्यमापन करणाऱ्या परीक्षक मंडळींनी उत्तम प्रकारे काम केले. त्यानुसार मोठ्या गटातून पांचाळ परिवार (हर्डी) तर लहान गटात देवाशीष नवरे (राजापूर) प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले .
लहान गटातून द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ओंकार सावंतआणि संभव पांचाळ यांची, तर उत्तेजनार्थ ओम बावधनकर.यांची निवड झाली. मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक चिन्मय व अथर्व आरेकर बंधू तर तृतीय क्रमांकासाठी चिन्मय व आदित्य शिवलकर यांची निवड करण्यात आली. उत्तेजनार्थ क्रमांक चंडिका देवी आंगले यांनी मिळवला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवर्य वासुकाका जोशी भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर सरसंघचालक राजेंद्र कुशे, महिला पतपेढीच्या संचालिका श्रुती ताम्हणकर, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता चंद्रशेखर अभ्यंकर, स्पर्धेचे परीक्षक भाजप तालुकाध्यक्ष मोहन घुमे, परीक्षक संतोष जुवळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर आणि प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार उपस्थित होते. नवयुग फोटो स्टुडिओचे प्रदीप कोळेकर यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व दुर्गवीर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रास्ताविकात महेश मयेकर यांनी प्रतिष्ठानच्या १४ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला, प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रांतिकारकांची गाथेमधून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांची आणि क्रांतिकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन, दरवर्षी स्वराज्याचे वैभव असलेल्या छत्रपती शिवरायांच्या गडदुर्गांना, शिवस्मरण यात्रेच्या माध्यमातून अभ्यास भेट व पाहणी, गडदुर्गांची स्वच्छता मोहीम, प्राचीन कालगणना असलेली मराठी महिन्यांची हिंदु पंचांग दिनदर्शिका, कराओकेवर गीत गायन स्पर्धा, गडदुर्ग बांधणी स्पर्धा, शिवतीर्थावर दीपोत्सव असे अनेक उपक्रम राबविले जातात, याची माहिती दिली.
यावेळी दुर्गवीरांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता चंद्रशेखर अभ्यंकर म्हणाले, गडदुर्ग बांधताना छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या गडदुर्गांच्या प्रतिकृती साकारायला हव्यात, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करुन, संघटित करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. दुर्गवीरांनी शिवकालिन ऐतिहासिक काळाचा अभ्यास करून या गडदुर्गांच्या प्रतिकृती साकारताना छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूर वीर मावळ्यांना अनुभवायला हवे.
श्रुती ताम्हणकर म्हणाल्या, दगडमाती एकत्र करून गडदुर्गाची प्रतिकृती साकारताना, छत्रपती शिवरायांचे संघटनकौशल्य लक्षात घ्यायला हवे. छत्रपतींचा आदर्श आपल्यासाठी प्रेरणादायक असून तो आपल्याला समजण्यासाठी शाश्वत इतिहास वाचायला हवा. तो आपल्या अंगी बाणावण्यासाठी प्रयत्न करायला हवा. स्पर्धेचे परीक्षण संतोष जुवळे, राहुल ताईशेट्ये आणि महेश मयेकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी