
छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)
वाचनाची आवड मानवाला सुसंस्कृत बनविण्याबरोबरच त्याला भौतिक व मानसिकरित्या प्रगत करण्यास सहाय्यभूत ठरते. वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यामुळे माणूस वाचतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांनी केले.
सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय, शासकीय विभागीय ग्रंथालय आणि युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह तथा भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बालसाहित्यिकांच्या कार्यशाळेचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन समर्थ नगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड बोलत होते.
बालवयातच वाचनाची व लिखाणाची गोडी शिक्षकांमुळे मिळाल्याचे सांगून बालवाचकांना तसेच नवोदित लेखकांना लिखाणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन बाबा भांड यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप, युगंधरा प्रकाशनच्या सुनिता कावसनकर, पी.यू. जैन शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटोदी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर,डी.बी.देशपांडे हे उपस्थित होते.
कार्यशाळेस शहरातील श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला,जय भवानी माध्यमिक विद्यामंदिर, देवगिरी हायस्कूल, न्यू देवगिरी हायस्कूल,मराठा हायस्कूल, पी. यु. जैन माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे यांनी मानले. याप्रसंगी भरविण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन दि.२० नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी निशुल्क खुले राहणार असून परिसरातील वाचन प्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis