
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने सोलापूरच्या जुबेर हंगरगेकर याला ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून अटक केली आहे. त्याच्याकडे मशिनगन बनविण्याबद्दलची कागदपत्रे मिळाली होती. जुबेरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. जुबेर हंगरगेकर याच्या लॅपटॉपमध्ये एक टीबीपेक्षा अधिक डेटा एटीएसला मिळाला आहे. हंगरगेकरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची तपासणी सुरू असून लॅपटॉपमधील फाईल्सच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम एटीएसकडून सुरू आहे. अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबेरची रवानगी विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने जुबेरच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु