
जळगाव, 15 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असून याच दरम्यान पारोळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून मुसक्या आवळल्या. मनोज पाडुरंग गायकवाड (रा. लामकाणी, ता. जि. धुळे) असं चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 307/2024 अंतर्गत भादंवि कलम 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, विष्णु बिर्हाडे, दिपक माळी, रविंद्र पाटील, रावसाहेब पाटील व चालक दिपक चौधरी यांचा समावेश होता.पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, मनोज पाडुरंग गायकवाड चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत आहे. पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एक होंडा शाईन व दोन होंडा युनिकॉन अशा तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार सर्व तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून संबंधित गुन्हे पारोळा व जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर