छ. संभाजीनगर : कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सोमवारपासून
छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि.१७ नोव्हेंबर ते दि.२ डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकंनी आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करावे,अस
छ. संभाजीनगर : कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सोमवारपासून


छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि.१७ नोव्हेंबर ते दि.२ डिसेंबर

दरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकंनी आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या २५ लक्ष ६ हजार २२१ व शहरी लोकसंख्या ४ लाख ३५ हजार ३२९ मिळून एकूण २९ लाख ४१ हजार ५५० लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २२५४ पथके स्थापन करण्यात आले असून ४५०८ कर्मचारी तसेच ४५० पर्यवेक्षक त्यात सहभागी होणार आहेत.

जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० PB व ११७ MB असे एकूण २६७ कुष्ठरुग्ण आढळले असून या सर्व रुग्णांवर आवश्यक औषधोपचार सुरु आहेत.

कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, परिघीय नसा, डोळे आणि शरीरातील काही अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजारासंदर्भात समाजामध्ये अद्यापही भीती, गैरसमज आणि भेदभाव टिकून आहेत. लवकर निदान व उपचार न झाल्यास Grade–II Disability निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र चे उद्दिष्ट

राज्य शासनाने सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेअंतर्गत — संसर्गाची साखळी तोडणे, नव्या रुग्णांचा प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे, समाजातील भेदभाव पूर्णपणे दूर करणे,यावर विशेष भर दिला जात आहे.

कुष्ठरोग नियंत्रणासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी निदान झालेल्या रुग्णांची अचूक नोंद, उपचार आणि नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना Post Exposure Prophylaxis (PEP) देणेही महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना कुष्ठरोग निदान व नोंदणीसंबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

वेळीच लक्ष, चाचणी व उपचार

कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी भीती न बाळगता पुढील लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

लक्षणेः- त्वचेवर फिकट, लालसर, बधिर चट्टे, त्या ठिकाणी घाम कमी येणे, त्वचेवर जाड, बधिर, तेलकट व चमकदार ठिपके गाठी किंवा पॅचेस, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे न मिटणे,हात-पायांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा, पायावर/तळहातावर जखमा,हात-पायाची बोटे वाकडी होणे, हात किंवा पाय लुळा पडणे,गरम–थंड संवेदना न जाणवणे, अशक्तपणा, हातातून वस्तू गळणे, चालताना चप्पल गळून पडणे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

या कुष्ठरुग्ण शोध मोहिमे अंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, उपसंचालक, आरोग्य सेवा – डॉ. कांचन वानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande