
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिका-यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदा-या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची सद्यस्थितीचा आढावा घ्यावा, त्याठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी. विशेषत: सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विशेष कक्ष कार्यान्वित करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच कायदा व सुव्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी विविध अनुषंगाने यावेळी आढावा घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांनी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष आणि त्याच्या नोडल अधिकारी यांनी पार पाडावयाची जबाबदारी याविषयी माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis