
इस्लामाबाद, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला वारंवार लक्ष्य केलं जातं आहे. आता पुन्हा एकदा हल्ला जाफर एक्सप्रेसवर करण्यात आला. मात्र,यावेळी हि ट्रेन हल्ल्यातून थोडक्यात बचावली. ही घटना रविवारी बलुचिस्तानच्या नसीराबाद परिसरात घडली. क्वेटा ते पेशावर जाणाऱ्या या ट्रेनच्या मार्गावर अज्ञात दहशतवाद्यांनी स्फोटक सामग्रीचा विस्फोट घडवून आणला. यामध्ये रेल्वे पटरीच्या एका भागाचे नुकसान झाले.
माहितीनुसार, हा धमाका इतका तीव्र होता की रेल्वे पटरीचा एक भाग तुटला, परंतु सुदैवाने ट्रेन त्या वेळी त्या ठिकाणाहून पुढे निघून गेली होती आणि मोठा अपघात टळला. ट्रेनला उडवण्याचा प्रयत्न एवढ्यावरच थांबला नाही, तर दूरून 4 रॉकेट्सही फायर करण्यात आले होते. सुदैवाने हे रॉकेट्स ट्रेनला न लागता बाजूने निघून गेले आणि प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोटानंतर काही तासांसाठी रेल्वे सेवा थांबवण्यात आली. सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची तपासणी केली.
नसीराबादचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुलाम सरवर यांनी सांगितले की जाफर एक्सप्रेस ज्या दुर्गम आणि डोंगराळ भागातून जाते, त्या ठिकाणी उग्रवाद्यांच्या हल्ल्याचा धोका कायम असतो. ही ट्रेन वर्षभरात अनेक वेळा लक्ष्य बनली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ट्रेनचे अपहरण केले होते, ज्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्येही एका स्फोटामुळे अनेक डबे रुळांवरून घसरले होते. सततच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रेनवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असली, तरीही धोका अद्यापही कायम असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode