
वॉशिंग्टन, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय वंशाचे जोहरण ममदानी यांनी अलीकडेच न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भव्य विजय मिळवला. जोहरान ममदानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे एकमेकांचे कट्टर टीकाकार मानले जातात. मात्र आता स्वतः ट्रंपच ममदानी यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी माध्यमांशी बोलताना ट्रंप म्हणाले की, “मी न्यूयॉर्कच्या महापौरांना भेटू इच्छितो. लवकरच यासाठी काहीतरी करू. बैठकीची तारीख अजून निश्चित झालेली नाही, पण आम्ही न्यूयॉर्कला कसे अधिक चांगले बनवता येईल, यावर चर्चा करू.”
डेमोक्रॅट पक्षातील स्टार नेता मानले जाणारे ममदानी न्यूयॉर्कमधील अत्यंत लोकप्रिय चेहरा बनले आहेत.
जोहरण ममदानी यांनी ट्रंप यांच्यावर सांप्रदायिक राजकारण करण्याचा आरोप अनेकदा केला आहे. तर ट्रंप यांनी हे आरोप नाकारले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी ममदानींना धमकी देत म्हटले होते की ते त्यांना अमेरिकेबाहेर पाठवतील. ट्रंप यांनी अगदी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “जर न्यूयॉर्कमधून ममदानी जिंकले, तर केंद्र सरकारकडून मिळणारा निधी थांबवीन.”
जोहरण ममदानी यांचा जन्म युगांडामध्ये झाला असून नंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. ममदानी व्यवसायाने वकील असूनही अमेरिकन राजकारणात त्यांनी प्रभावी प्रतिमा निर्माण केली आहे. न्यूयॉर्क सिटी महापौर निवडणुकीत प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी ट्रंपविरोधात अधिक उघडपणे भूमिका मांडली.महापौर म्हणून विजयी झाल्यानंतर ममदानी म्हणाले होते, “न्यूयॉर्कने सिद्ध केले आहे की राष्ट्राध्यक्षालाही हरवता येते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode