
ढाका , 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हसीना यांनी गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचारानंतर भारतात आश्रय घेतला होता, तेव्हापासून ते इथेच राहत आहेत. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारने एक निवेदन जारी करुन हसीना यांना परत पाठवण्याची विनंती केली आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) जुलैमध्ये झालेल्या हिंसाचार आणि हत्याकांडासाठी जी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्ज्मान खान कमाल दोघांनाही मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही देशाने त्यांना आश्रय देणे म्हणजे हे न्यायाची थट्टा आणि अत्यंत शत्रुत्वाचे कृत्य असेल.
युनूस सरकारने भारतासोबत 2013 च्या प्रत्यार्पण कराराचाही हवाला दिला आणि भारत सरकार प्रत्यार्पणासाठी बांधील असल्याचे म्हटले. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि कमाल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ढाका येथे हिंसाचार उसळला आहे. युनूस सरकार याबाबत कारवाई करत असून अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode