नथिंग फोन ३ए लाईट भारतात 27 नोव्हेंबरला होणार लॉंच
मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। लंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने अखेर आपल्या मिड-रेंज सेगमेंटमधील नवीन स्मार्टफोन नथिंग फोन ३ए लाईटच्या भारतातील लॉंच तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा फोन 27 नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार असून, किंमत आणि विक्रीसंदर
Nothing Phone 3A Lite to launch


मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। लंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने अखेर आपल्या मिड-रेंज सेगमेंटमधील नवीन स्मार्टफोन नथिंग फोन ३ए लाईटच्या भारतातील लॉंच तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा फोन 27 नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार असून, किंमत आणि विक्रीसंदर्भातील तपशील लॉंच इव्हेंटमध्ये उघड केले जातील. गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर पदार्पण केलेल्या या स्वस्त आणि साध्या आवृत्तीमुळे भारतीय बाजारात मिड-रेंज स्पर्धा आणखी वाढणार आहे.

जागतिक बाजारात या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत EUR 249 (सुमारे 25,600 रुपये ) आहे. भारतात मात्र कर आणि इतर शुल्कांमुळे किंमत 25,000 रुपये ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB व 256GB स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये तसेच ब्लॅक आणि व्हाइट या दोनच रंग पर्यायांसह उपलब्ध होईल.

नथिंग फोन ३ए लाईट मध्ये 6.77 इंचाचा FHD+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि तब्बल 3000 निट्सपर्यंतचा पीक ब्राइटनेस यामुळे व्हिज्युअल अनुभव अधिक प्रभावी होणार आहे. पांडा ग्लास प्रोटेक्शनही डिस्प्लेचे सुरक्षिततेसाठी दिले आहे.

फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रो हा 4nm ऑक्टा-कोर प्रोसेसर, Mali-G615 MC2 GPU, LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. हायब्रिड स्लॉटमुळे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येण्याची सुविधाही उपलब्ध आहे. फोन अँड्रॉइड 15 आधारित नथिंग ऑपरेटिंग सिस्टम 3.5 वर चालतो आणि प्री-इंस्टॉल्ड इंस्टाग्राम व फेसबुक अ‍ॅप्स हटविण्याची सुविधा कंपनीने दिली आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीतही हा फोन सक्षम ठरणार असून यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 10x डिजिटल झूम सपोर्ट मिळतो. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून तो 1080p 60fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, यूएसबी टाइप-सी ऑडिओ, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, ५जी एसए/एनएसए सपोर्ट आणि IP54 रेटिंग यांसारखी आधुनिक वैशिष्ट्येही यात समाविष्ट आहेत.

नथिंगचा पारदर्शक ग्लास बॅक आणि सिग्नेचर Glyph इंटरफेस ही वैशिष्ट्ये देखील या फोनमध्ये कायम ठेवण्यात आली आहेत. 164x78x8.3 मिमी परिमाण आणि 199 ग्रॅम वजन असलेला हा फोन हाताळण्यास हलका आणि आकर्षक आहे. भारतीय मिड-रेंज बाजारात या फोनला सॅमसंग, शाओमी, रिअलमी आणि विवो सारख्या ब्रँड्सशी कडवी स्पर्धा करावी लागेल. मात्र अनोख्या डिझाइनसोबत स्वच्छ सॉफ्टवेअर अनुभव देणारा हा फोन तरुण ग्राहकांना विशेष आकर्षित करू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande