बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना मृत्यूदंड..!
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा मोठा निर्णय ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : बांगलादेशच्या न्यायालयाने आज, सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धचा निकाल जाहीर केला. न्यायालयाने त्यांच्यावर लावलेले आरोप योग्य ठरवत त्यांना फाशीची शिक्षा स
शेख हसीना वाजेद, माजी पंतप्रधान बांगलादेश


आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा मोठा निर्णय

ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : बांगलादेशच्या न्यायालयाने आज, सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धचा निकाल जाहीर केला. न्यायालयाने त्यांच्यावर लावलेले आरोप योग्य ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या 23 ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या (आयसीटी) न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला होता, जो आता जाहीर झाला आहे.

शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशच्या न्यायालयात 5 गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. आयसीटीच्या न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवत म्हटले की, त्या सर्वाधिक शिक्षेस पात्र आहेत. हत्या आणि कटकारस्थानाचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत. या प्रकरणाचा निर्णय 400 पानांचा असून त्याचे 6 भाग करण्यात आले आहेत. न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की, शेख हसीनांनी मानवतेविरुद्ध गुन्हे केले आहेत. 5 ऑगस्ट रोजी चंखारपुल येथे 6 आंदोलनकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. शेख हसीनांच्या आदेशावर त्या वेळीच्या गृहमंत्री आणि पोलीस प्रमुखांनी कारवाई केली, ज्यात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे सर्वकाही त्यांच्या आदेशावर झाले, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात शेख हसीना यांच्यासोबत बांग्लादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल यांचीही नावे आहेत. जस्टिस मोहम्मद गोलाम मजूमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला.

पाच गंभीर आरोप:

1. पहिला आरोप

अभियोजन पक्षाने शेख हसीना आणि इतरांवर खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार आणि अमानुष कृत्यांचे आरोप लावले. तसेच अवामी लीग आणि सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या अत्याचारांना प्रोत्साहन देणे, उकसवणे, मदत करणे आणि ते थांबवण्यात अपयशी ठरण्याचेही आरोप लावले.

14 जुलैच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजी गृहमंत्री असदुज्जमां, माजी पोलीस महानिरीक्षक मामून आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये मदत केल्याचे आरोप होते.

2. दुसरा आरोप

शेख हसीनांनी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि घातक शस्त्रांचा वापर करून विद्यार्थी आंदोलनकर्त्यांच्या सफाईचे आदेश दिल्याचा आरोप आहे. माजी गृहमंत्री आणि माजी पोलीस प्रमुखांनी त्यासाठी कायदा व सुव्यवस्था दलांना निर्देश दिल्याचे म्हटले आहे.

3. तिसरा आरोपरंगपूर येथील बेगम रोकैया विद्यापीठाजवळील आंदोलनकर्ते विद्यार्थी अबू सईद यांच्या हत्येचा आरोप. तसेच भडकाऊ भाषण करून विद्यार्थ्यांविरुद्ध घातक शस्त्रांच्या वापराचे आदेश दिल्याचा आरोपही त्यांच्या विरोधात आहे.

4. चौथा आरोप

ढाका येथील चंखारपुलमध्ये 5 ऑगस्ट रोजी 6 निःशस्त्र आंदोलनकर्त्यांना गोळ्या घालून मारण्याचा आरोप. हे सर्व आरोपींच्या आदेशावर, चीथाववण्यात आणि कटकारस्थानामुळे झाल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे आहे.

5. पाचवा आरोप

अशुलिया येथे 5 ऑगस्ट रोजी सहा विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची गोळ्या घालून हत्या, त्यातील पाचांना नंतर जाळणे आणि सहाव्याला जिवंतपणी जाळल्याचा आरोप आहे.

न्यायालयाने निर्णय नोंदवण्यासाठी वेळ घेतल्याने निकाल देण्यात थोडा विलंब झाला. विविध अहवालांमध्ये शेख हसीनांनीच आंदोलनकर्त्यांवर हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला होता, तसेच न्यायालयाला त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाले.

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे गृहमसलतार जहाँगीर आलम चौधरी यांनी सांगितले की, सरकार न्यायाधिकरणाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करेल.

अपीलसंदर्भात विचारले असता, अभियोजक तमीम यांनी सांगितले की फरार आरोपीला अपील करण्याचा अधिकार नाही. अपील करण्यासाठी आरोपीने अटक होणे किंवा आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे. निर्णयाच्या 30 दिवसांत अपील दाखल करावे लागते आणि सर्वोच्च न्यायालयाने 60 दिवसांत त्यावर निर्णय द्यायचा असतो.

शेख हसीना सध्या भारतात आहेत. त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल अवघड होताना दिसत आहे.

शेख हसीनांची प्रतिक्रिया

शेख हसीनांनी म्हटले की, त्यांच्यावरचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि निर्णयाने त्यांना काहीही फरक पडत नाही.

त्या म्हणाल्या:

“मला काही फरक पडत नाही. जीवन अल्लाहने दिले आहे आणि तेच ते परत घेतील. अवामी लीग ही जमिनीवरून उभी राहिलेली पक्ष आहे. मला बांग्लादेशच्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे. ते भ्रष्ट, उग्रवादी आणि हत्यारे यूनुस आणि त्याच्या साथीदारांना उखडून फेकतील. लोक न्याय करतील.”

समर्थकांना संदेश देताना त्या म्हणाल्या:

“मी जिवंत आहे, जिवंत राहीन आणि लोकांच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी बांग्लादेशच्या लोकांसाठी न्याय करेन. मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप लावणाऱ्यांना सांगू इच्छिते की मी 10 लाख रोहिंग्या शरणार्थ्यांना आसरा दिला होता.”

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande